नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच, भारतातील कोरोना संकट पुन्हा वाढताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज तब्बल 12 टक्के अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी ताजी आकडेवारी जारी केली. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 47,092 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. काल हा आकडा 41,965 एवढा होता. याचबरोबर, गेल्या 24 तासांत 509 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 35,181 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्येत एकूण 11,402 ने वाढ झाली आहे. (coronavirus update about new covid cases deaths and recovery)
केरळमध्ये कोरोना रुग्ण संख्या अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 32,803 नवे कोरोना बाधित आढळून आले. तर संक्रमणामुळे आणखी 173 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांनंतर येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 40 लाख 90 हजार 36 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 20,961 वर पोहोचला आहे.
"देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक"
अशी आहे देशाची स्थिती - आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 28 लाख 57 हजार कोरोना बाधित समोर आले आहेत. यापैकी 4 लाख 39 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत झाले आहेत. देशातील कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. सध्या, 3 लाख 89 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण कोरोना रुग्ण - तीन कोटी 28 लाख 57 हजार 937एकूण डिस्चार्ज- तीन कोटी 20 लाख 28 हजार 825एकूण सक्रिय रुग्ण - तीन लाख 89 हजार 583एकूण मृत्यू - चार लाख 39 हजार 529एकूण लसीकरण- 66 कोटी 30 लाख 37 हजार डोस देण्यात आले