नवी दिल्ली : देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून, रविवारचा उच्चांक मोडीत निघाला असल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (coronavirus update in india)
केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले असून, ४७८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत १ कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ
देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ४१ हजार ८३० इतकी आहे. आतापर्यंत देशात १ कोटी २५ लाख ८९ हजार ०६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७ कोटी ९१ लाख ०५ हजार १६३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ५७ हजार नवे करोनाबाधित आढळून आले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.
‘ही’ मागणी आपण ताबडतोब मान्य करावी; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती
दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केला. मात्र, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे.