देशात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट दिसून आली आहे. मात्र, मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या 24 तासांत 2 लाख 9 हजार 918 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात 2,62,628 लोक बरे झाले आहेत.
देशात सक्रीय रुग्णांची संख्या आजही १८ लाखांवर आहे. देशात एकूण 18 लाख 31 हजार 268 रुग्ण उपचार घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभराची आकडेवारी पाहता, कोरोना आपल्या जुन्या रुपात येत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोना पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव करणार का, अशी शंका तज्ज्ञांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे.
देशात रविवारी 893 आणि शनिवारी 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजचा आकडा हा 900 पार आहे. यामुळे हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असताना मृत्यूंचा आकडा वाढू लागला आहे.
केरळमध्ये सर्वाधिक 51,570 रुग्ण आहेत. यानंतर कर्नाटकात २८,२६४, महाराष्ट्रात २२,४४४, तामिळनाडूमध्ये २२,२३८, आंध्र प्रदेशात १०,३१० रुग्ण सापडले आहेत. या 5 राज्यांमध्ये, देशातील एकूण रुग्णांपैकी 64.22% रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये २४.५७% रुग्ण सापडले आहेत.