चीनसह आशियाच्या एका मोठ्या भागामध्ये कोरोनाने कहर मांडण्य़ास सुरुवात केली आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांत जेवढे रुग्ण सापडले नव्हते, तेवढे दररोज सापडू लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जगात पुन्हा कोरोना डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी झळ बसलेल्या भारताने कोरोना प्रतिबंधक उपायांची तयारी सुरु केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना लाटेवरून राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य, आरोग्य सचिवांना पत्र लिहून पंचसूत्रीचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे. या साऱ्यांना पत्राद्वारे सावध करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही, याचा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये. पाच गोष्टींची काळजी घ्या. यामध्ये चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉल यांचा समावेश आहे.
पत्राद्वारे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना Insacag नेटवर्कला पुरेशा प्रमाणात नमुने पाठवत राहण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून नवीन कोरोना प्रकार वेळेत शोधता येईल. 'दक्षिण-पूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट दिसत आहे. या कारणास्तव, आरोग्यमंत्र्यांनी 16 मार्च रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जीनोम सिक्वेन्सिंगवर जोमाने काम करावे, तसेच कोविड-19 च्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी सूचना करण्यात आली होती. राज्यांनी पंचसूत्रीकडे लक्ष द्यावे, असे राजेश भूषण यांनी म्हटले आहे.
लोकांनाही सतर्क राहण्याचा सल्लाकेंद्र सरकारने म्हटले आहे की राज्यांनी लोकांना कोरोना लस घेण्यास प्रोत्साहित करणे सुरू ठेवावे. तसेच, लोकांनी मास्क लावावा, सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवावे आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.