धक्कादायक! जयपूरमधील एका महिन्याच्या चिमुकल्याला कोरोना; देशात रुग्णांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:08 PM2023-12-22T17:08:11+5:302023-12-22T17:08:17+5:30
Coronavirus News: देशातील अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
Coronavirus News ( Marathi News ): जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, आता भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे एक महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. तर ऑस्ट्रेलियाहून मायदेशात आलेल्या जोधपूरमधील एका तरुणीला कोरोना झाला आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
जोधपूरमधील एक तरुणी अलीकडेच ऑस्ट्रेलियातून परतली होती. यानंतर ही तरुणी आजारी पडली. कोरोनाची लक्षणे आढळल्याने चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तरुणीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच घरातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. गुरुवारी जयपूरमध्ये दोन कोरोनाबाधित लोक आढळले. त्यापूर्वी जैसलमेरमध्येही दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शुभ्रा सिंह यांनी आदेश जारी करून राज्य कोविड व्यवस्थापन पथकाची स्थापना केली आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
देशभरात कोरोनाचा धोका वाढत आहे
देशात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे ६४० नवीन रुग्ण आढळले. देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २,९९७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे, केरळमध्ये कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये तीन, कर्नाटकमध्ये दोन आणि पंजाबमध्ये एकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. देशातील संसर्ग दर सध्या १.१९ टक्के आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत केरळमध्ये २६५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंत महाराष्ट्रात ५३, गोव्यात, १६, गुजरातमध्ये ३२, तामिळनाडूत १०४, तेलंगणात १९ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. घाबरण्याचे कारण नसून काळजी घेण्याचे आवाहन राज्य तसेच केंद्रातील आयोग्य यंत्रणांकडून करण्यात आले आहे.