गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला अडीच लाखांवर कोरोनाबाधित सापडत आहेत. अशावेळी आज दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 2,58,089 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. कालच्यापेक्षा हा आकडा 13,113 रुग्णांनी कमी आहे. तर 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 1,51,740 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 16,56,341 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट 119.65 टक्क्यांवर गेला आहे. तर ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 8,209 वर गेला आहे.
आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 157.20 कोटी डोस देण्यात आले आहेत. चाचणीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नुसार, भारतात काल म्हणजेच रविवारपर्यंत 13,13,444 चाचण्या करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 70,37,62,282 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात मुंबईत २० हजारांच्या घरात असलेला दैनंदिन रुग्णवाढीची संख्या रविवारी आठ हजारांवर आली आहे. गेल्या २४ तासात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोविडमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय, सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने यंत्रणांसह मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शहर उपनगरांत रविवारी २१ हजार २५ रुग्ण बरे झाले आहेत, तर दिवसभरात ७,८९५ रुग्ण आणि ११ मृत्यूंची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा काळ ४८ दिवसांवर असून सक्रिय रुग्णसंख्या ६०,३७१ झाली आहे.