नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात १८,३४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात २,५२,९०२ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात २०९ दिवसांनी आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल (सोमवारी) २९ हजार ६३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन २ लाख ५२ हजार ९०२ इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५३ हजार ४८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख ४९ हजार २६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३१ लाख ५० हजार ८८६ रुग्ण ठिक झाले आहेत.
दरम्यान, कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज २०२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ३८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८६ हजार ०५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.