नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात १८,८७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २८,१७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२९,८६,१८० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहता देशातील कोरोना संसर्ग आता बऱ्याच अंशी नियंत्रणात आला आहे. मंगळवारी (२८ सप्टेंबर) नोंद झालेल्या दैनंदिन कोरोना प्रकरणांची संख्या १८ हजार ७९५ होती. जी सोमवारच्या (२७ सप्टेंबर) तुलनेत २७.८ टक्के कमी होती. दिलासादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे देशात गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच दैनंदिन कोरोना प्रकरणांची संख्या २० हजारांच्या खाली गेली आहे.
सणासुदीच्या काळात सतर्कतेचा इशारा
दरम्यान, देशात लसीकरणाचा वेगही अतिशय वेगाने वाढवण्यात आला आहे. परंतु लोकांना आरोग्य मंत्रालय आणि तज्ज्ञांकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला जात आहे की, सणांच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांवर भर देण्याचे म्हटले आहे. निष्काळजीपणामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.