नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २४,३५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात २,७३,८८९ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
केरळमध्ये शुक्रवारी १३ हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ९५ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांनंतर केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळत आहे. देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून शुक्रवारी कोरोनाचे ६९ लाख ३३ हजार ८३८ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण ८९ कोटी ७४ लाख ८१ हजार ५५४ इतके डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी ३१०५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल ३ हजार १६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७४ हजार ८९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.