नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात १८,७९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २६,०३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२९,५८,००२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मे महिन्यापासून दक्षिण भारतातील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या असामान्यपणे वाढली, परंतु इतर राज्यांमध्ये प्रकरणे सामान्य राहिली. ईशान्येसह काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली होती, परंतु केरळमधील परिस्थिती चिंताजनक बनली होती. दरम्यान, संपूर्ण देशातील ५५ टक्के सक्रिय प्रकरणे केरळमधील आहेत. राज्यात सध्या १.६३ लाख सक्रिय प्रकरणे आहेत.
सणासुदीच्या काळात सतर्कतेचा इशारा
दरम्यान, देशात लसीकरणाचा वेगही अतिशय वेगाने वाढवण्यात आला आहे. परंतु लोकांना आरोग्य मंत्रालय आणि तज्ज्ञांकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला जात आहे की, सणांच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांवर भर देण्याचे म्हटले आहे. निष्काळजीपणामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.