नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात ३४,४०३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ०५६ वर पोहोचली. तर गेल्या २४ तासांत ३७,९५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२५,९८,४२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, राज्यात गुरुवारी ३,५९५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख २० हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के आहे. राज्यात गुरुवारी ४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात २,८९,४२५ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर १९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईत मागील काही दिवसांमध्ये चढउतार दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात ४४६ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४६५४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत १६ हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मार्च २०२० पासून आतापर्यंत मुंबईत सात लाख ३६ हजार ७७० रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण सात लाख १३ हजार ६०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना मुक्तीचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे तर दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही रुग्णांना सहव्याधी होत्या. ६० वर्षांवरील हे दोन्ही रुग्ण पुरुष होते. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर आता ०.०६ टक्के एवढा आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२७९ दिवस आहे.