नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ५८ हजार नवे रुग्ण आढळून आले. ३० मार्चनंतर ते आतापर्यंतच्या कालावधीतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. ८७ हजार जण बरे झाले असून सलग ३८ व्या दिवशी बरे झालेल्यांचा आकडा नव्या रुग्णांहून अधिक आहे. सध्या ७२ हजार कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
३० मार्च रोजी ५६,२११ नवे रुग्ण सापडले होते. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ एकूण रुग्णांपैकी २ कोटी ८७ लाख ६६ हजार ९ जण बरे झाले. गेल्या चोवीस तासांत ८७ हजार ६१९ जण बरे झाले असून, १५७६ जण मरण पावले. मृतांची एकूण आकडेवारी ३ लाख ८६ हजार ७१३ इतकी आहे. एकूण रुग्णांपैकी ९६.२६ टक्के जण बरे झाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने सांगितले की, आजवर ३९ कोटी १० लाख १९ हजार ८३ कोरोना चाचण्या पार पडल्या. तसेच कोरोना लसीचे २७ कोटी ६६ लाख ९३ हजार ५७२ डोस देण्यात आले.
ब्राझीलमध्ये ५ लाख नागरिकांचा मृत्यू
ब्राझिलमध्ये कोरोना बळींचा आकडा ५ लाखांवर पोहोचला आहे. तेथे १ कोटी ७८ लाख कोरोना रुग्ण असून ११ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत ३ कोटी ४४ लाखांपैकी २ कोटी ८६ लाख जण कोरोनामुक्त झाले. तेथे ३ लाख ८६ हजार लोक या संसर्गाने जीवाला मुकले असून ५० लाख लोक उपचार घेत आहेत. जगभरातील १७ कोटी ८९ लाख कोरोना रुग्णांपैकी १६ कोटी ३५ लाख जण बरे झाले. तसेच १ कोटी १५ लाख जणांवर उपचार सुरू आहेत.