CoronaVirus Guidelines: राज्यासह देशात अनेक ठिकाणी H3N2 विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यासाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, त्यातच आता कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत राजधानी दिल्लीत ७२ आणि महाराष्ट्रात २३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही राज्यांतील सरकारी यंत्रणांना आणि लोकांना सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनासोबत इतर कोणतेही विषाणूजन्य संसर्ग आहे का, याची नोंद घ्यावी, असे नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्रालयाचा या राज्यांना अलर्ट
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्य सरकारांना कोविड चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरणाच्या धोरणाचं पालन करण्यासाठी पत्र लिहिले होते. या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे मंत्रालयाने या राज्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला ५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध घेतले जाऊ शकते पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती मात्र, आता पुन्हा कोविडबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही आठवड्यांत रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १०७१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ५,९१५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"