नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात कोरोना हातपाय पसरत आहे. दिल्ली-महाराष्ट्र सारख्या राज्यात धोक्याची घंटा वाजवणाऱ्या धोकादायक कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा भीती दाखवली आहे. देशात आज कोरोना व्हायरसने मोठी झेप घेतली आहे. देशात एका दिवसात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत, ही संख्या गेल्या बुधवारच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ दिसून येत आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट 4.42 टक्क्यांवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 10,158 नवीन प्रकरणे प्राप्त झाल्याने देशात सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. तर देशातील एकूण कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 4,42,10,127 च्या वर गेली आहे.
बुधवारी देशात 7,830 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतात कोविडचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि पुढील 10-12 दिवस रुग्णांमध्ये वाढ होईल. मात्र, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होईल. दरम्यान, वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताप, सर्दी खोकला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
'हे' आहे कोरोनाचे नवे रूप धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच ओमायक्रॉनच्या XBB1.16 या व्हेरिएंटमध्ये म्यूटेशन झाले आहे. यामुळे आता आणखी एक XBB1.16.1 हा व्हेरिएंट समोर आला आहे. आकडेवारीनुसार, दिल्ली, गुजरात आणि हरयाणासह एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16.1 आढळला आहे. भारतीय सार्स Cove-2 जिनोमिक्स कंसोर्टियमच्या (INSACOG) आकडेवारीनुसार, 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16 व्हेरिएंटचे 1,774 रुग्ण आढळून आले आहेत.