नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. संपूर्ण देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ९३ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वांत मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. तसेच काल दिवसभरात ५०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. (coronavirus updates in india)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील आकेडवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार, संपूर्ण देशभरात गेल्या २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ६० हजार ०४८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा
उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ लाखांच्या घरात
आताच्या घडीला देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ०१ कोटी २४ लाख, ८५ हजार ५०९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, यापैकी एकूण ०१ कोटी १६ लाख २९ हजार २८९ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. तसेच ७ कोटी ५९ लाख ७९ हजार ६५१ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे नेमकं काय होतं; तज्ज्ञांच्या स्पष्टीकरणानं चिंता आणखी वाढली
महाराष्ट्रातही उच्चांकी वाढ
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण ४,०१,१७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.४९% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, हळूहळू काही सेवा बंद करण्याचा, काही भागांत कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी राज्यात एकदम बंद करून हळूहळू सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा होतो, हा माझा अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.