विकास झाडे
नवी दिल्ली : कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चार हजारांचा टप्पा गाठला आहे. मृत्यूची संख्या कमी होणे आणि पुन्हा चार हजारांवर जाणे असे कित्येक दिवस सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत चिंता व्यक्त केली असून रुग्णांच्या शुश्रूषाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना देशभरातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४ हजार २०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताचा कोरोना मृत्यूदर १.११ वरून १.१२ टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५४८, तामिळनाडू ३९७ तसेच दिल्लीत २५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, मृत्यूच्या नोंदी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये ३००९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ४.७६ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी हा दार ५.५० टक्के होता.
गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ५९ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर ३ लाख ५७ हजार २९५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ झाली आहे. यातील २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. ३० लाख २७ हजार ९२५ रुग्णांवर (११.६३%) उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ८७.२५ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत १ लाख १ हजार ९५३ ने घट नोंदवण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांतील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७७ टक्के रुग्ण १० राज्यांत आढळले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ३५ हजार ५७९ रुग्णांची भर पडली. केरळ ३०,४९१, महाराष्ट्र २९,९११, कर्नाटक २८,८६९, आंध्र प्रदेश २२,६१०, प. बंगाल १९,०९१, ओडिशा ११,४९८, राजस्थान ७,६८०, उ. प्रदेश ६,६८१ तसेच आसाममध्ये ६ हजार ५७३ रुग्ण नोंदविण्यात आलेत.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या१) कर्नाटक - ५,३४,९७५२) महाराष्ट्र - ३,८५,७८५३) केरळ - ३,१८,२२०४) तामिळनाडू - २,६३,३९०५) आंध्र प्रदेश - २,०९,१३४६) राजस्थान -१,४३,९७४७) प. बंगाल - १,३१,५१०८) उ. प्रदेश - १,१६,४३४
लसीकरण! देशात आतापर्यंत १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ लसीचे डोस लावण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १४ लाख ८२ हजार ७५४ लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण ३२ कोटी ४४ लाख १७ हजार ८७० तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील २० लाख ६१ हजार ६८३ तपासण्या २४ तासात करण्यात आल्यात.