कोरोनाची दुसरी लाट ओसरून कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याचे समाधान वाटत असतानाच ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनाची नांदी झाली आहे. तूर्तास देशात ‘डेल्टा प्लस’चे ४८ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असू शकते...
भारतासाठी अधिक चिंताजनक का?
भारतात आता कुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. देशातील ९० जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमीकमी होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मात्र, डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण देशात आढळून आले आहेत. त्यांचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुपांतर होण्याचा धोका आहे. डेल्टा उत्परिवर्तनाची पुढची पायरी असलेला डेल्टा प्लस भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकणार आहे.
डेल्टा उत्परिवर्तन म्हणजे काय?
आता डेल्टा उत्परिवर्तन म्हणजे काय, हे समजून घेऊ.डेल्टा हा कोरोनाचा नवअवतार आहे. प्रत्येक विषाणू परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणत असतो. त्यानुसारच कोरोनाचा डेल्टा हा नवअवतार आला. त्याचे रुग्ण महाराष्ट्रात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आढळून आले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) डेल्टा उत्परिवर्तन जगभरातील ७५ देशांमध्ये उपस्थित आहे. या उत्परिवर्तनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात अमेरिकेत तिपटीने वाढली.
डेल्टाची मुख्य लक्षणे कोणती?
- कोरोनाच्या आतापर्यंतच्या उत्परिवर्तनांमध्ये दिसून न आलेली लक्षणे डेल्टाच्या बाधेत आढळतात.
- कोरोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती झपाट्याने खालावते.
- डोकेदुखी, घशाला सूज, नाक गळणे आणि ताप ही मुख्य लक्षणे आहेत डेल्टाची.
- कोरोनाच्या या उत्परिवर्तनाची बाधा झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डेल्टा प्लस काय आहे?
कोरोना विषाणूच्या डेल्टा या उत्परिवर्तनाची पुढील पायरी म्हणजे डेल्टा प्लस
डेल्टा प्लसचे तांत्रिक नाव बी.१.६१७.२.१ असे आहे. डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण यंदा मार्च महिन्यात युरोपमध्ये आढळून आला. हा उत्परिवर्तित विषाणू लसी, अँटिबॉडीज आणि संसर्गाला विरोध करणाऱ्या प्रतिकारशक्ती यांना जुमानत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
धोकादायक आहे का?
तूर्तास यासंदर्भातील पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, जीवशास्त्रीय नियमानुसार प्रत्येक विषाणूचे उत्परिवर्तन अधिक धोकादायक असते. कारण उत्परिवर्तित विषाणू चिवटपणे अस्तित्व टिकवण्याचे जोरदार प्रयत्न करतो. डेल्टा प्लस उत्परिवर्तन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला तर त्याचा संसर्ग अधिक झपाट्याने वाढून गंभीर आजारपणाची लक्षणे वाढीस लागतील आणि अधिकाधिक लोकांना रुग्णालयात दाखल होण्यावाचून पर्याय उरणार नाही. कोरोनावर सध्या उपलब्ध असलेली औषधे आणि लसी यांनाही हा उत्परिवर्तित विषाणू जुमानणार नाही, असा होरा आहे.