नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २६,०४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २९,६२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२९,३१,९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात रविवारी ३ हजार २०६ रुग्ण आणि ३६ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर सध्या ३७ हजार ८६० रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६३ लाख ६४ हजार २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८१ लाख ५८ हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ६१ हजार ७२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर १ हजार ५१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के असून मृत्यूदर २.१२ टक्के आहे.
मुंबईत रविवारी ४७९ रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४१ हजार २४० वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा १६ हजार ८४ वर पोहोचला आहे. सध्या ४ हजार ६६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख १८ हजार २ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०६% टक्के आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २०८ दिवसांवर येऊन ठेपला आहे.