नवी दिल्ली: देशभरात गेल्या 24 तासांत सलग सातव्या दिवशी एक लाखाहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 72 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. तर 3921 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 19 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार, भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 वर गेली आहे. देशात 2 कोटी 81 लाख 62 हजार 947 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 74 हजार 305 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 9 लाख 73 हजार 158 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
13 जूनपर्यंत देशभरात 25 कोटी 48 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. रविवारी दिवसभरात 14 लाख 99 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 38 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. रविवारी दिवसभरात 14.92 लाख कोरोना सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे.
दरम्यान, राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे चिंता वाढवणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 7 हजार 504 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 95.44 टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या 24 तासांत राज्यांत एकूण 10 हजार 442 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईकरांना काहीसा दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 30 हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत केवळ 700 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत 704 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
दिवसभरात मुंबईत 19 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 15 हजार 183 इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 15 हजार 773 उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून, रुग्णवाढीचा दर 0.10 टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी 653 दिवसांवर गेला आहे.