देहरादून – शहरातील राजकीय दून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री एकाच वेळी अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे ऑक्सिजन लाईनमध्ये प्रेशर वाढल्यानं रुग्णांना पुरवठा करण्यास समस्या जाणवली. अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांसोबत संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दून हॉस्पिटलच्या सूत्रांनुसार, मंगळवारी रात्री जवळपास १०० पेक्षा अधिक रुग्णांना एकाच वेळी ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटपासून लाईन सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच नियोजन केले. एकाच वेळी ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावर ताण आला. त्यामुळे रुग्णांना गरजेप्रमाणे ऑक्सिजन पुरवणं हॉस्पिटल पुढे समस्या निर्माण झाली. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं कळताच मेडिकल स्टाफने अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यानंतर प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संचालकांशी संपर्क साधला. रात्री उशीरा तज्ज्ञांसोबत मिळून स्टाफने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सगळ्या लाईन तपासल्या आणि पुरवठा सुरळीत केला. याठिकाणी डॉक्टर म्हणाले की, जर वेळीच मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजनची व्यवस्था केली नसती तर नाशिकसारखी दुर्घटना घडली असती. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला आणि यात २२ रुग्णांचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये काय घडलं?
शहरातील मनपाच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नांदुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले त्यावेळेस दुरुस्तीचे काम सुरू असताना ऑक्सिजन टाकीचा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला. नवीन कॉक बसवून गळती थांबविण्यासाठी २ तासांचा कालावधी लोटला. तोपर्यंत ऑक्सिजन टाकी रिकामी झाली होती. दुपारी २ वाजता पर्यायी टॅंकर पुरविला गेला त्याद्वारे टाकी भरण्यात आली.
या २ तासाच्या कालावधीत हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठाचा दाब पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण हे एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली. तब्बल २२ रुग्ण या दुर्घटनेत दगावल्याची माहिती जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या दुर्दैवी घटनेची संपूर्णपणे चौकशी केली जाईल आणि दोषी असणार्यांवर कारवाई करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.