इस्त्रायल, अमेरिकेनंतर कोरोना लस घेतलेल्यांना (Corona Vaccination) सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा भारतातील राजस्थान सरकारने (Rajasthan) दिली आहे. राजस्थानमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे गेहलोत सरकारने एक आदेशच जारी केला आहे. हा आदेश उद्यापासून लागू होणार आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोना लसीकरण अभियानात राजस्थान पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. (Rajasthan Government allow to vaccinated people to go at public places like bus stand, railway station.)
गेहलोत सरकारने २८ जून म्हणजेच सोमवारपासून कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले नागरिक सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच बस स्टँड, रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी प्रवेश करू शकणार आहेत. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी गेहलोत सरकारने शनिवारी ही नियमावली जाहीर केली आहे. या मुक्त संचारासाठी कोरोना लसीचा किमान एकतरी डोस घेतलेला असायला हवा.
गेहलोत सरकारकडून जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये , उद्यापासून राज्य सरकारची कार्यालये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या व्यापारी संस्था, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, ते अतिरिक्त तीन तास आपले कामकाज सुरु ठेवू शकणार आहेत. धार्मिक स्थळेदेखील सशर्त खुली करण्यात येणार आहेत. तसेच लग्न सोहळे आयोजित करण्यासाठी हॉल १ जुलैपासून उघडण्यात येणार आहेत.
‘डेल्टा’ व्हेरिएंटचा धोका; लस घेतली तरी मास्क वापराकोरोनाच्या डेल्टा या नव्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या जगभरात वाढत आहे. त्यामुळे ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, त्यांनीही यापुढे मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आदी नियमांचे पालन सुरूच ठेवावे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
संघटनेच्या औषधे व आरोग्य उत्पादने विभागाच्या सहायक महासंचालक मरिआंगेला सिमाओ यांनी सांगितले की, कोरोनाला केवळ लस घेतल्यामुळे रोखता येणार नाही. त्यासाठी मास्कचा नेहमी वापर केला पाहिजे. अतिशय घातक असलेला डेल्टा विषाणू अनेक देशांत पसरत असल्याने लस घेतलेल्यांनीही पूर्ण दक्षता घ्यावी. कोरोनाचे नवे विषाणू निर्माण होत आहेत. युरोपात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी जगभरात या साथीने डेल्टाच्या रूपाने वेगळे वळण घेतल्याने कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असेही सिमाओ यांनी सांगितले.