नवी दिल्ली : भारताच्या औषध महानियंत्रकांनी ६ ते १२ वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन आणि १२ हून अधिक वयोगटासाठी झायडस कॅडिला कंपनीच्या झायकोव्ह-डी या कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. तज्ज्ञ गटांच्या बैठकीनंतर मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. देशात सध्या १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स, तर १५ ते १७ वयोगटाला कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत.
आजच्या निर्णयामुळे ६ ते १२ वयोगट आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी देशात तीन लसी दिल्या जातील. तज्ज्ञांच्या समितीने काही दिवसांपूर्वीच ५ ते ११ वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्स या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी, अशी शिफारस केली होती. ही लस हैदराबाद येथील बायोलॉजिकल ई या कंपनीने विकसित केली आहे.
४.१५ कोटी मुलांना दुसरा डोसआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १२ ते १४ या वयोगटातील मुलांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू करण्यात आले. यात आतापर्यंत २.७ कोटी मुलांनी लसीची पहिली तर ३७ लाख मुलांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. १५ ते १८ वयोगटात ५.८२ कोटी मुलांना पहिली, तर ४.१५ कोटी मुलांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.