नवी दिल्ली : अठरापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रावर कोविड - १९ प्रतिबंधक लसीची मोफत दक्षता मात्रा देण्याच्या ठरावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. यासाठी १५ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले की, कोविड - १९विरोधी लढाईत लसीकरण एक प्रभावी उपाय आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयाने भारतात लसीकरणाची व्याप्ती वाढेल आणि निरोगी राष्ट्र निर्माण करण्यास मदत मिळेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागच्या आठवड्यात सर्वांसाठी लसीची दुसरी आणि दक्षता मात्रा यातील अंतर नऊ महिन्यांवरुन कमी करुन ६ महिने केला होता.