Coronavirus Vaccination In India for Kids : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु आता लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. भारतात. सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाची सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एम्सचे प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
लहान मुलांना देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरू आहे आणि त्याचा अहवाल सप्टेंबरपर्यंत मिळण्याची अपेक्षा असल्याचं गुलेरिया म्हणाले. फायझरच्या लसीला यापूर्वी FDA ची मंजुरी मिळालीआहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांचं लसीकरण सुरू केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कोरोना लसींच्या खरेदीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ८०७१.०९ कोटी रुपये यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत लसखरेदीसाठी खर्च करण्यात आले. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक-व्ही या तीन लसींना केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. तसेच मॉडेर्ना लसीची निर्यात करण्यास मुंबईतील सिप्ला कंपनीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. बायोलॉजिकल ईच्या कोरोना लसीचे ३० कोटी डोस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम त्या कंपनीला दिली आहे.