मुंबई: जगातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगात सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलं आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस पूर्णपणे यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या कोरोना लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्यातून समोर आलेले निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटनं दिली आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे. सध्या तरी या लसीचे कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स दिसले नसल्याचं लॅन्सेटनं सांगितलं आहे.ऑक्सफर्डची लस पूर्णपणे सुरक्षित आणि उपयुक्त ठरल्यास त्याचा भारताला मोठा फायदा होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं अॅस्ट्रा झिनेका कंपनीनं COVID-19 वरील लस तयार केली आहे. अॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) या कंपनीनं या लसीसाठी परवानादेखील मिळवला आहे. या लसीचं उत्पादन भारतात सुरू झालं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लसीचं उत्पादन करत आहे.अॅस्ट्रा झिनेकाच्या लसीचं उत्पादन पुण्यात सुरू आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबतमिळून या लसीच्या उत्पादनालाही सुरुवात केली आहे. या कोरोना लसीचे 1 अब्ज व्हायल्स बनविण्यात येणार असून ही लस कमी उत्पन्न असलेल्या देशांनाही पुरवली जाणार आहे. यापैकी 40 कोटी व्हॅक्सिन 2020 च्या अखेरपर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एप्रिलमध्येच सीरम इन्स्टिट्यूटनं याची घोषणा केली होती. यासाठी आपण मोठी रिस्क घेत असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. भारतात या लसीची किंमत १००० रुपये असू शकते. सीरम ही ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूट वर्षाला जवळपास १.५ अब्ज लसींचे उत्पादन करते. जगातील १७० देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो.
CoronaVirus News: ऑक्सफर्डमधील चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट भारतासाठी दिलासादायक; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 9:12 PM