मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड लसीचा साडेसात लाखांहून अधिक साठा कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडे सर्व वयोगटातील लाभार्थ्यांना दक्षता मात्रा मोहिमेचे लसीकरण सुरू करण्याचे सुचविले आहे, त्या माध्यमातून वाया जाणारा लस मात्रांचा साठा टाळता येईल, असेही आयएमएने नमूद केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सौरभ संजनवाला यांनी सांगितले, खासगी क्षेत्राकडे लाखो लसींचा साठा आहे, त्याचा वापर झाला नाहीतर याचा आर्थिक फटका बसेल. शिवाय, कोरोना प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणात वाया जाईल. याकरिता, शासनाला सर्व लाभार्थ्यांसाठी दक्षता मात्रा मोहीम राबविण्याचे सुचविले आहे.