नवी दिल्ली – कोरोना व्हायरसची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचं सांगितले जात आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे. २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी ट्रायल करण्यात आली आहे. आतापर्यंत जगात इतक्या छोट्या वयातील मुलावर कोरोना चाचणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलांना तीन गटात विभागणी केली आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे. लसीची चाचणी करण्यासाठी तीन गटात मुलांना विभागण्यात आलं आहे. पहिल्या गटात २-६ वयोगटातील मुले. दुसऱ्या गटात ६ ते १२ वयोगट तर तिसऱ्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे.
अशी झाली लसीची चाचणी
लसीची चाचणी करण्यापूर्वी पहिल्या दिवशी १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. ज्यात २० मुले लसीसाठी तंदरुस्त असल्याचं आढळलं. त्या मुलांना लसीचा डोस दिला. बुधवारी ६ ते १२ वयोगटातील १० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील ५ मुलं पात्र असल्याचं समोर आलं. त्या मुलांनाही लसीचा डोस दिला गेला. त्यानंतर या मुलांना ४५ मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात आलं. ज्यातील २ मुलांमध्ये इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी सौम्य लाल खूणा दिसून आल्या जी सामान्य मानलं जातं.
इतक्या लहान वयोगटातील जगातील पहिलीच चाचणी
लसीच्या चाचणीचे मुख्य संशोधक बालरोग तज्ज्ञ प्रोफेसर वीएन त्रिपाठी म्हणाले की, २ वर्षाच्या मुलांवर कोरोना चाचणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. इतक्या छोट्या वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी कुठेच झाली नाही. आता २ वर्षाच्या मुलावर कोरोना लसीची चाचणी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. कानपूरमध्ये आतापर्यंत मोठ्या व्यक्तींवर कोरोना चाचणी झाली होती. रशियाची स्पुतनिक आणि झाइडस कॅडिला लसीची चाचणीही झाली. लस उत्पादन करणाऱ्या अन्य कंपन्या कानपूरमध्ये चाचणी करण्यासाठी प्रयत्नात आहे. कोव्हॅक्सिनचं नेजल स्प्रे पुढील महिन्यात येणार आहे.