नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने देशांतर्गत लसीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविड-१९ प्रतिबंधक ‘ॲस्ट्राझेनेका’च्या लसीची निर्यात तात्पुरती थांबविली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त सहकार्याने मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना लसीचा पुरवठा करण्याच्या (कोव्हॅक्स) कार्यक्रमांवर या निर्णयाचा परिणाम होईल. या कोव्हॅक्स अभियानास ‘सीरम’कडून १ कोटी ७७ लाख ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस मिळाले आहेत.
कोरोनाचा उद्रेकामुळे देशांतर्गत लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आल्याने गुरुवारपासून भारतातून लस निर्यात करण्यात आलेली नाही. भारतातील स्थिती स्थिर होईपर्यंत लस निर्यात केली जाणार नाही. तूर्त लसीची निर्यात थांबविण्यात आली आहे, असे दोन सूत्रांनी ओळख उघड न करता सांगितले. भारतालाच लसीची मोठी गरज असल्याने सरकार सध्या तरी लस निर्यात करण्याची जोखीम घेणार नाही. तथापि, या वृत्तास विदेश मंत्रालय आणि सीरमकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कोव्हॅक्स कार्यक्रमानुसार खरेदी करून लसीचे वितरण करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या युनिसेफ या संस्थेकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी ॲस्ट्राझेनेका आणि नोवावॅक्स लसीचे १.१ अब्ज डोस खरेदीचा करार करण्यात आला. सीरमकडून ब्राझील, ब्रिटन, मोरोक्को आणि सौदी अरेबियाला ‘ॲस्ट्राझेनेका’ लस पाठविण्यास आधीच दिरंगाई झाली आहे. अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भारत सरकारने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने सीरमला मासिक १४ कोटी १०० लाख डोसचा पुरवठा करणयास सांगितले आहे, तसेच एप्रिल-मेपासून ७ कोटींवरून मासिक १० कोटी डोस तयार करण्याचा सीरमचा इरादा आहे.