कठुआ - कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे हजारो मजूर विविध राज्यांत अडकले आहेत. तसेच, रोजगारामुळे अनेक मजूर कारखान्यांमध्येच थांबले आहेत. जम्मूतील कठुआ जिल्ह्यात शुक्रवारी कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या मजुरांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी मजुरांनी पूर्ण पगार मिळाला नसल्याचा आरोप केला आहे.
शुक्रवारी कठुआमध्ये शेकडो मजूर रस्त्यांवर उतरले आणि कपडा गिरणीच्या परिसरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी येथील अनेक गाड्यांचे नुकसान केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मजुरांचे म्हणणे एकूण घेतले. आयपीएस शैलेंद्र मिश्रा यांनी भोजपुरी भाषेत मजुरांसोबत चर्चा केली आणि त्यांना समजावले. तसेच, त्यांनी कापड गिरणी मालकांसोबत चर्चा करून पगार देण्याचे आश्वासन मजुरांना दिले.
विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी गर्दी जमल्यामुळे कोरोना वाढते संकट पाहता, अशा परिस्थितीत या मुजरांना समजावून सांगणे आणि त्यांना परत पाठविणे प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांच्या आवाहानानंतर मजुरांचा रोष काही प्रमाणात शांत झाला. पण, हे सर्व मजूर अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यातील मजूर घरी परतण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. याशिवाय, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सुरतमध्ये एका कंपनीच्या साइटवर मजूरांचा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले होते.