नवी दिल्ली: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र कोणतीही लक्षणं नसल्यानं नायडू यांना डॉक्टरांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नायडू यांच्या पत्नी उषा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
उपराष्ट्रपतींच्या सचिवालयानं ट्विटर हँडलवरून थोड्याच वेळापूर्वी व्यंकय्या नायडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. 'आज सकाळी उपराष्ट्रपतींची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. त्यांना घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यादेखील विलगीकरणात आहेत,' अशी माहिती सचिवालयाकडून देण्यात आली आहे.