मुंबई: कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत असून बाधितांची संख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे २३ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात दररोज कोरोनाचे २५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर्स ट्रस्टची स्थापना केली. यामध्ये सढळ हस्ते दान करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं. या आवाहनाला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. यावर आता बॉलिवूडमधील संगीतकार विशाल ददलानीनं भाष्य केलं आहे. इस्रायलमधील तेल अविव शहरात सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. कोरोना संकटकाळातील चुकीचं व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. त्याचा संदर्भ देत विशाल ददलानीनं मोदी सरकारवर निशाणा साधला. 'लोकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांबाबत विचारणं आता बंद केलं आहे. आपण प्रश्न विचारायला घाबरतो. प्रशासनाकडे आपण उत्तर मागत नाही. आपण गुलामसारखे आहोत आणि मग भारत महासत्ता का झाला नाही, म्हणून विचारणा करतो,' अशा शब्दांत त्यानं देशातल्या स्थितीवर भाष्य केलं आहे. विशालनं काल देशातील कोरोनाच्या स्थितीवरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. 'शेठ देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या. आता 8 लाख झालेत. DJ वाजवून बघूया का..?', असा खोचक सवाल त्यानं विचारला होता. विशालचं हे ट्विट लक्षवेधी ठरलं. जवळपास तीन हजार जणांनी ते लाईक केलं. तर पाचशेहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं.