मदुराई - असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. त्याचे विवाहात रुपांतर पृथ्वीवर होते. मात्र, काही विवाह याला अपवाद ठरतात. असाच एक विवाह नुकताच पार पडला. लग्नगाठ स्वर्गात आणि विवाह हवेत म्हणजे विमानात असे त्याचे वर्णन करावे लागेल.विमानात, जहाजात लग्न करण्याचे प्रकार आता नवीन राहिले नाहीत. असेच एक लग्न नुकतेच विमानात झाले. मदुराईहून हे वऱ्हाड बंगळुरुला गेले तर, विवाह समारंभ विमान हवेत उडत असताना पार पडला. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या वऱ्हाडींविरुद्ध तक्रार दाखल करण्यास स्पाइसजेटला सांगितले आहे. मदुराईतील एका जोडप्याने स्पाईसजेट कंपनीचे विमान भाड्याने घेऊन विमानातच विवाह करण्याची हौस पूर्ण केली खरी, पण कोरोनाच्या नियमांचे अजिबात पालन केले नाही. दि. २३ मे रोजी सकाळी झालेल्या या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्पाईसजेट बोईंग ७३७ मदुराईतील ट्रॅव्हल एंजटने २३ मे, २०२१ रोजी भाड्याने घेतले होते. आता कारवाईचे विघ्न- यावेळी वधू व वराचे नातेवाईक व निमंत्रित विमानात होते. उपस्थितांपैकी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हता व ते नियमांचे पालनही करीत नसल्याचे व्हिडिओत दिसते. -विमानात ज्या लोकांनी नियमांचे पालन केले नाही त्यांच्याविरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यास स्पाईसजेटला सांगण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही कठोर कारवाई करू, असे डीजीसीएने सांगितले.
Coronavirus: विमानात वऱ्हाड आणि हवेतच झाले लग्न, आता कारवाईचे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:17 AM