नवी दिल्ली: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासनाकडून याबद्दल जनजागृती सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र देशात लॉकडाऊन सुरू होण्याच्या केवळ एक आठवडा आधी मास्क वापरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर उपराष्ट्रपती भडकले होते. तुम्ही मास्क काढून या. अन्यथा, मी काय करेन हे तुम्हाला माहित्येय, या शब्दांमध्ये नायडूंनी विरोधी खासदारांना कारवाईचा इशारा दिला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मे रोजी देशाला संबोधित केलं. मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर २५ मेपासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र मोदींच्या घोषणेच्या आठवड्याभर आधी विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत मास्क घालून आले होते. त्यावेळी सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यांना बाहेर जा आणि मास्क काढून या, अशी सूचना केली. १८ मार्च रोजी हा प्रकार घडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
CoronaVirus News: खासदारांनो, तुम्ही मास्क काढा, अन्यथा...; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:56 AM