नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी झूम व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. देशात टेस्टिंग किट्स वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. राहुल गांधी वारंवार कोरोनावर ट्विट करत होते. त्यामुळे पत्रकारांनी राहुल यांना प्रश्न विचारला की, कोरोना व्हायरसच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी चूक काय केली? लॉकडाऊनचं प्लॅनिंग करण्यात पंतप्रधान कमी पडले का? असं विचारण्यात आलं.
पत्रकाराच्या या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी याचं उत्तर त्यादिवशी सांगेल जेव्हा भारत कोरोनाला हरवेल. आज मी फक्त काही सल्ला देऊ शकतो. आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत मला पडायचे नाही. असं त्यांनी सागंतिले. तसेच विरोधी पक्ष सरकारला सल्ले देत आहे. तुम्ही स्वत: अनेकदा काही सूचना केल्या आहेत. पण केंद्र सरकार तुमच्या सूचना ऐकत नाही, काँग्रेसला क्रेडिट दिलं जाईल असं त्यांना वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, मला कोणतंही श्रेय नको, फक्त देशातील जनता सुरक्षित राहायला हवी. आम्हाला श्रेयवादाशी देणंघेणं नाही. ज्यांना श्रेय लाटायचे आहे त्यांनी घेऊद्या. आमचं काम रचनात्मक पर्याय सूचवणे आहे ते घ्यावे की नाही हा सरकारचा निर्णय आहे असं राहुल गांधींनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याचेही राहुल गांधींनी सांगितले. ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.