नवी दिल्ली – संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचं घोषित केल्यानंतर अनेक मजुरांचे आणि कामगारांचे हाल झाले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करणं गरजेचे होतं असं सांगत पतंप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माफी मागितली पण या लॉकडाऊनमुळे चालत गावाकडे निघालेल्या एका माणसाचा जीव गेला.
दिल्लीहून मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या रणवीर सिंह यांचा आग्रा येथे मृत्यू झाला. रणवीर सिंह दिल्लीत कुरिअर बॉयचं काम करत होते. लॉकडाऊनमुळे दिल्लीत खाणं-पिणं कठिण झाल्याने त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. कोणतीही वाहन व्यवस्था नसल्याने गावच्या दिशेने चालत जावं लागलं. मृत्युपूर्वी रणवीरने त्याच्या सहकाऱ्यांसोबत गावी जाण्याचं ठरवलं. दिल्लीपासून फरिदाबादला पोहचलेल्या रणवीरने रात्री साडेनऊ वाजता बहीण पिंकीला कॉल केला. याबाबत पिंकीने सांगितले की, मला त्यादिवशी अचानक भावाचा फोन आला. लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं त्यामुळे मी चालत घराकडे येत आहे. सुरुवातीला हे ऐकून मला धक्का बसला. बीबीसीने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.
भावाचा फोन ठेवल्यानंतर पिंकी औषध घेऊन झोपी गेली. त्यानंतर सकाळी पाचच्या सुमारास पिंकीच्या मोबाईलवर रणवीर सिंहचा फोन आला. या कॉलवरुन रणवीरने माझ्या छातीत दुखू लागलं असं सांगितले. त्यानंतर पिंकीने रणवीरला एका ठिकाणी बसण्यास सांगितले. दिल्लीहून मथुरामार्ग सकाळी आग्रा येथे पोहचला होता. पायपीट केल्यानं रणवीर थकलेला दिसून आला. रणवीरसोबत दिल्लीत एकत्र राहणारे त्याचे नातेवाईक अरविंद होते. अरविंदसोबत रणवीरने शेवटचं बोलणं केलं. अरविंद संपूर्ण रात्र रणवीरच्या संपर्कात होता. रात्रभर चालून रणवीरची तब्येत बिघडली, कोरोनाच्या भीतीने कोणीही मदतीसाठीही आलं नाही. अखेर नॅशनल हायवेवर रणवीरचा साडेसहा वाजता मृत्यू झाला.
मला फोन केला त्यावेळी रणवीरने सांगितले माझ्या छातीत दुखत आहे. मला घेण्यासाठी येणं शक्य असेल तर ये, मी त्याला बोललो की १०० नंबरवर कॉलकर कोणीतरी मदतीसाठी येईल. त्यानंतर त्याचा आवाज बंद झाला. या कॉलनंतर ८ मिनिटांनी मी पुन्हा कॉल केला त्यावेळी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने कॉल उचलला, त्याने सांगितले रणवीरची तब्येत गंभीर आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं अरविंदने सांगितले.