इंदुर - कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव देशात रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी याबाबत घोषणा करताना लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केले आहे. लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रदिवस काम करत आहेत. तर, वैद्यकीय क्षेत्र पायाला भिंगरी लावून नागरिक आणि रुग्णांच्या सेवेत गुंतले आहे. मात्र, या तातडीची सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि पोलिसांवरच हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. याबाबत, इंदुरधील या घटनेवर प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनी दु:ख व्यक्त केलंय.
देशात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच इंदोरमध्ये अशी एक घटना घडली की, आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे. इंदुरमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा भाजपा नेते आणि माजी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी निषेध केला आहे. त्यानंतर, आता शायर राहत इंदोरी यांनीही ट्विटवरुन एक व्हिडीओ अपलोड करत नागरिकांनी आवाहन केलं आहे.
तुमच्याकडे आलेले लोकं हे तुमच्यासाठी आले होते, तुमच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी ते आले होते. त्यांच्यासोबत जे तुम्ही वागलात, त्याने संपूर्ण देश व्यथीत झाला आहे. या इंदुर शहराला, जे संस्कारी, उच्चशिक्षित आणि नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं, त्यास काय झालंय? असा प्रश्न सर्वांना पडलाय. कुणाची नजर लागलीय या शहराला, कुठल्या अफवांमध्ये तुम्ही अडकलाय. परमेश्वरासाठी तरी विचार करुन पाऊल टाका. डॉक्टर, पोलीस हे सर्व आपले मदतगार आहेत. जर, आपण त्यांची मदत केली, तरच उद्या वेळ आपल्याला मदतीला येईल, असे भावूक आवाहन डॉ. राहत इंदोरी यांनी केलंय.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांचे बॅरिकेड सुद्धा तोडले आणि मेडिकल टीमला मारहाण करत त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई करत लोकांवर नियंत्रण मिळविले. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी निषेध नोंदवला असून हा हल्ला माफीलायक नसल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, मानवसेवेचं काम करत असलेल्या सर्वच डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याची मागणीही शिंदे यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.