नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लाग करण्यात आलेले व्यापक लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अनलॉक-1 असे नाव देऊन देशातील लॉकडाऊनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना राजीव बजाज यांनी आपलं मत मांडलं.
या संवादावेळी बजाज अॉटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले की, "भारतात ड्रेकोनियन म्हणजेच निर्दयी पद्धतीने लागू करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये एवढी सक्ती करण्याची गरज नव्हती. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे."
राजीव बजाज यांनी पुढे सांगितले की, जपान, अमेरिका, युरोप, सिंगापूरसारख्या देशात आमचे मित्र आहेत. त्याशिवाय जगातील अनेक देशातील मंडळींशी आमची चर्चा होते. मात्र भारतात कठोर पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा पद्धतीने कुठेही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जगातील अनेक देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची परवानगी होती. मात्र आपल्याकडे वेगळंच चित्र होतं.
लॉकडाऊनच्याबाबतीत नेमकं काय चुकलं हे सांगताना राजीव बजाज म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने पूर्वेकडील देशांऐवजी पश्चिमेकडे पाहिले. आम्ही इटली, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदींचे अनुकरण केले. खरंतर आपण पूर्वेकडील देशांचे अनुकरण केले पाहिजे होते. या देशात कोरोनाला रोखण्याच्याबाबतीत चांगले काम झाले. तापमान, भौगोलिक वैशिष्ट्य, मेडिकल सह तमाम वैशिष्ट्यांमुळे हे देश आपल्यासाठी अनुकरणीय ठरले असते.
सर्वसामान्यांच्या दृष्टीने लॉकडाऊन कठीण आहे. कारण भारतासारखे कठीण लॉकडाऊन कुठेच लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता प्रत्येक जण मध्यम मार्ग काढण्यासाठी इच्छुक आहे. भारताने पश्चिमेकडील देशांपेक्षा कठीण लॉकडाऊन लागू केले. कमकुवत लॉकडाऊनमुळे विषाणू पसरतो आणि कठोर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बिघडते, असेही ते पुढे म्हणाले. सध्या जगभरात सरकारकडून सर्वसामान्यांना थेट मदत दिली जात आहे. मात्र भारतात केवळ सहकार्याची भाषा केली गेली. सरकारकडून सर्वसामान्यांना पैसे दिले गेले नाहीत.
दरम्यान, या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लॉकडाऊन अपयशी ठरल्याचे सांगितले. माझ्या दृष्टीने भारतातील लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. आता केंद्र सरकार माघार घेत राज्यांना परिस्थिती सांभाळण्यास सांगत आहे.