नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे असून लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. लॉकडाऊनचा कालावधी उद्या संपत असल्याने नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सर्व देशाचे लक्ष असणार आहे.
देशात लॉकडाऊननंतरही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. अशातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा या राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं घोषित केले. मंगळवारी पंतप्रधान लॉकडाऊनबाबत काय घोषणा करतील याबाबत चर्चा सुरु आहे. पण तत्पूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्र्यांनी कार्यालयात जाऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काही निर्बंध शिथील केले जातील याचे संकेत मिळत आहेत.
अद्याप तरी नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र त्यापूर्वीच काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात देशात लॉकडाऊन वाढणार हे निश्चित आहे. पण लॉकडाऊन वाढणार ते आतासारखचं असणार की, दुसऱ्या टप्प्यात काही वेगळं असणार? हा प्रश्न उपस्थित होतो. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. पण दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणली जाणार असेही संकेत मिळत आहेत. पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना कार्यालयात जाऊन काम करण्याचं सांगितले. त्यानंतर प्रकाश जावडेकर, रिजीजूसह अन्य मंत्री कार्यालयात पोहचले.
आगामी लॉकडाऊनमध्ये काही निर्बंध उठवताना अटी-शर्ती लागू केल्या जाणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता याबाबत स्पष्टता येईल. लॉकडाऊनमुळे देशाला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागत आहे. कोरोना संकट असलं तरी आर्थिक व्यवस्था सांभाळणेही गरजेचे आहे. मागील काही दिवसांपासून रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनबाबत केंद्राकडून राज्य सरकारला सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ज्या भागात कोरोना संक्रमण अधिक आहे अशा परिसरात सक्तीने लॉकडाऊनचं पालन करावं लागणार आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील परिसर असतील तर ज्या ठिकाणी संक्रमण नाही अशा ग्रीन झोनमध्ये काही निर्बंध शिथील करुन लॉकडाऊनमध्ये आर्थिक आणि उत्पादन व्यवहार सुरु करण्याची परवानगी दिली जाईल. कारण याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानेही पत्रक काढत राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन कसा असणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनानंतरच देशवासियांना स्पष्ट होणार आहे.