मुंबई - एकीकडे देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन सुरू राहील की हटवण्यात येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर फिक्कीने देशातील लॉकडाऊन कधी आणि कशाप्रकारे हटवण्यात यावे याबाबत सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही भारतातील उद्योग आणि व्यवसायांचे हितसंबंध जपणारी संस्था आहे. देशातील लॉकडाऊन हळूहळू हटवण्यात यावे, तसेच आयटी कंपन्या आणि शाळा सद्यस्थितीत बंद ठेवाव्यात असे फिक्कीने म्हटले आहे. कामगारांना 15 एप्रिलपासून कामावर बोलावण्यात यावे. तसेच त्यांना कामावर येण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनामुक्त जिल्ह्यांपासून लॉकडाऊन हटवण्याची सुरुवात करण्यात यावी. रिटेल स्टोअर्सना अंशतः उघडण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच ई-कॉमर्स कंपन्या आणि देशांतर्गत उड्डाणांना अंशतः परवानगी देण्यात यावी.
रस्ते वाहतुकीला नियमांनुसार परवानगी देण्यात यावी. त्याबरोबरच रेल्वेसेवासुद्धा मर्यादित स्वरूपात सुरू करावी, असा प्रस्ताव फिक्कीने दिला आहे. मात्र शाळा आणि आयटीप्रमाणेच देशातील छोट्या आणि मोठ्या हॉटेलमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावे, असेही फिक्कीने म्हटले आहे.
संपूर्ण देशात मालवाहतुकीस परवानगी मिळाली पाहिजे. तसेच अत्यावश्यक साधनांच्या वाहतुकीसाठी लष्कराची मदत घेण्यात यावी. कोरोनामुक्त जिल्ह्यांत उत्पादन आणि वितरण सुरू व्हावे, सुरुवातीच्या काळात 22 ते 39 या वयोगटातील सुदृढ लोकांनी काम करावे. तसेच आजारी आणि ज्येष्ठ यांना सुदृढ कर्मचाऱ्यांपासून दूर ठेवावे.
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधा वाढवाव्यात. त्याबरोबरच कोरोना प्रभावित भागांना उच्च, मध्यम आणि कमी धोका असलेल्या भागांमध्ये विभाजित करण्यात यावे. मास्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण व्हावे आणि संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी व्हावी, अशी शिफारस फिक्कीने केली आहे.