नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. (Coronavirus in India) दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत किंचीत घट झाल्याचे दिसल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. यादरम्यान आता केंब्रिज जज बिझनेस स्कूल आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्चने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे. भारतामध्ये कोरोनाचा पीक येऊन गेला असून, आता नव्या रुग्णांचे प्रमाण घटत जाईल, असे सांगितले. या दोन्ही संस्थ्या केंब्रिज विद्यापीठाचा भाग आहेत. ( When will the second wave of coronavirus completely disappear from India? Cambridge University experts say the exact date)
मात्र तज्ज्ञांनी हेही सांगितले की, आता देशातील विविध राज्यांमधील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात तफावत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर आसाम, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि त्रिपुरा यासारख्या राज्यात पुढच्या दोन आठवड्यांमध्ये साथीचा पीक येऊ शकतो.
यादरम्यान, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ शाहिद जमील यांनी सांगितले की, सध्यातरी कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरायला काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. साधारणपणे जुलै महिन्याच्या अखेरीस भारताता आलेली कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरेल. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशातील नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मात्र सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी दुसऱ्या लाटेची अखेर होण्यास काही महिन्यांचा अवधी लागेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रचंड प्रकोपासाठी कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट्स कारणीभूत असू शकतात. मात्र हे व्हेरिएंट्स अधिक धोकादायक असल्याचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील रुग्ण हे सर्वसामान्यपणे दुसऱ्या वा तिसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे कमी होतात त्या वेगाने कमी होणार नाहीत, अशी शक्यताही शाहीद जमील यांनी वर्तवली.
भारतात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देशात एका दिवसांतील सर्वाच्च रुग्णसंख्या ही ९६-९७ हजार एवढी नोंदवली गेली होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये ती सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे या लाटेला ओसरण्यासाठी वेळ लागेल. तसेच सध्या अशी काही राज्ये आहेत. जिथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.