मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, मोदींनी देशहितासाठी आणि नागरिकांसाठी हे मोठं पाऊल उचललं आहे. देशातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पोलीस आहेत, तर रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिसतात. सर्वच राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सातत्याने बैठका घेत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. मात्र, याच काळात गृहमंत्र अमित शहा दिसत नसल्याची खंत नेटीझन्सने व्यक्त केली आहे. ट्विटरवर where_is_amit_shah असा ट्रेंड आज दिवसाच्या सुरुवातीलाच दिसून आला.
भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-१९ रोगाने मरण पावलेल्याची संख्या २० वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत नवीन ७५ रुग्ण आढळले.एकीकडे भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. शुक्रवारी केरळमध्ये ३९ आणि मुंबईत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ९ रुग्ण आढळले. जम्मू-काश्मिरमध्ये आणखी चौघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून यापैकी दोघे विदेशातून आले होते. देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत असताना गृहमंत्री अमित शहांचा या परिस्थितीला हाताळण्यात काहीही सहभाग नसल्याचे नेटीझन्सने म्हटले आहे.
ट्विटरवर आज टॉप न्यूज ट्रेंडमध्ये व्हेअर इज अमित शहा हा ट्रेंड पाहायला मिळाला. गेल्या ७० वर्षांतील सर्वात मोठ्या समस्येचा सामना देश करत आहे. मात्र, देशातील अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी गृहमत्री कुठे दिसून येत नाहीत. तसेच, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्टरप्लॅनही कुठे दिसत नाही, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.
अमित शहा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सक्रीय दिसत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीएमओ कार्यालयाचे ट्विट रिट्विट करुन ते fight_against_corona च्या लढाईत दिसून येतात. मीडियासमोर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते व्यक्तिगतपणे जनतेसमोर आले नाहीत. त्यामुळेच, नेटीझन्सने अमित शहा कुठे आहेत? असा प्रश्न विचारला आहे.