नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊनसह रात्रीच्या संचारबंदीसारख्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरूझाली आहे. तर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. (Coronavirus in Maharashtra) मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील (World health organisation ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे. लॉकडाऊनचे परिणाम गंभीर होतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला नियंत्रित करण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असेल असेही त्यांनी सांगितले. (WHO's researcher Dr. Soumya Swaminathan warns of lockdown; That said, the consequences will be serious)
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचार करण्यापूर्वी आणि पुरेशा लोकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात, असे खात्रीशीररीत्या सांगता येईल, असेही त्या म्हणाल्या. डब्ल्यूएचओने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यावर स्वामिनाथन यांनी सांगितले की, सध्या मुलांना कोरोनावरील लस देण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र लसीच्या दोन डोसमधील अंतर हे ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल.
दरम्यान, डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची नवी लाट संपूर्ण प्रदेशात पसरली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतामध्ये दररोज सरासरी २६ लाख लसी दिल्या जात आहेत. लसीकरणाबाबत केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे. अमेरिकेत सरासरी ३० लाख डोस दिले जात आहेत.
दरम्यान, पुण्यातील तज्ज्ञानी लॉकडाऊनवर आक्षेप घेतला आहे. प्रा. एल. एस. शशिधरा यांनी सांगितले की, गतवर्षी लॉकडाऊन दरम्यान, पुण्यामध्ये अनेक हॉटस्पॉट होते. लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर हे आकडे पुन्हा वाढू लागले. तेव्हा १० दिवसांचे लॉकडाऊनही निरुपयोगी ठरले होते. लॉकडाऊन दरम्यानही समूह संसर्गामुळे विषाणू लहान लहान समुहांमध्ये पसरतो. तसेच लॉकडाऊन हटवण्यात आल्यावर तो अधिक वेगाने पसरतो, असे त्या म्हणाल्या.