मुंबई - कोरोना व्हायसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात एकूण १२५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४९ विदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही, लॉकडाऊनचं उल्लंघन होताना दिसत आहे. काही मुस्लीम समाजातील लोक एकत्र येऊन नमाजपठण करत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील मस्जीद बंद करण्याच्या मागणीचं समर्थन केलंय.
काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही काही मुस्लीम आडमूठेपणा करीत मशिदीत, इमारतीच्या गच्चीवर सामुदायिक नमाज पठण करत असल्याचे लक्षात आले आहे. मुस्लिमांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे, असे आवाहन कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे. आता, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील सर्वच मस्जिद बंद करण्याची मागणणी उचलून धरली आहे.
जावेद अख्तर यांनी अल्पसंख्यांक आयोगाचे माजी प्रमुख ताहिर महेमूद याचा हवाला देत, यासंदर्भात ट्विट केले आहे. एक स्कॉलर आणि अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष तारिक महेमूदसाहब यांनी दारुल उलम देवबंद येथून एक फतवा जारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसा, देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच मस्जीद बंद करण्यात याव्यात, असे म्हटले आहे. मी या मागणीचे समर्थन करतो, असे जावेद अख्तर यांनी म्हटलंय. जर, काबा आणि मदिना येथे मंस्जीद बंद होणार असतील, तर भारतील मस्जीद का बंद होऊ शकत नाहीत, असा सवालही अख्तर यांनी विचारला आहे. जावेद अख्तर यांच्या मागणीपूर्वीच देवबंद येथील दारुल उलमचे मोहतमिमि मौलाना मुफ्कीत अबुल कासीम नोमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चिठ्ठी लिहून दारुल उलमच्य इमारतीला आयसोलेशन वॉर्ड बनविण्याचं सूचवलं आहे. संकटाच्या या कठीणकाळात देवबंद दारुल उलम देश आणि सरकारसोबत आहे, असे नोमानी यांनी पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान, 'सब कुछ अल्लाह के मर्जी से होगा, वह बचाने वाला है वगैरे वक्तव्य करुन मुस्लिमांना दुआ करायला सांगितले जात आहे. अंधश्रद्धाही पसरवल्या जात आहेत. अशा वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन मुस्लीमांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहिजे, मंदिर बंद आहे, चर्च बंद आहे. मशिदीही बंद ठेवल्या पाहिजेत. देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढताना सर्वांसोबत मुस्लिमांनी सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे.