नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी लॉकडाऊन वाढवतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. मात्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. २४ मार्चला देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे पुढचा लॉकडाऊन दोन किंवा तीन आठवड्यांचा असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अन्यथा महिना संपेपर्यंत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाईल, असं अनेकांना वाटतं होतं. मात्र मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मोदींनी ३ मेची निवड का केली, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामागे तीन महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्रानं एकट्यानं घेतलेला नाही. राज्य सरकारांच्या शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार एप्रिलपर्यंतच लॉकडाऊनची घोषणा करणार होतं. मात्र १ मे रोजी जागतिक कामगार दिन आहे. त्यानंतर दोन आणि तीन तारखेला शनिवार, रविवार आहेत. म्हणूनच राज्यांनी लॉकडाऊन तीन दिवस वाढवण्याची शिफारस केली.तीन दिवस लॉकडाऊन वाढवून असा कोणता फायदा होणार, असा प्रश्नदेखील काही जण उपस्थित करत आहेत. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असता, तर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये १६ दिवसांची भर पडली असती. मात्र ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्यानं आता १९ दिवसांनी लॉकडाऊन वाढला आहे. कोरोनाची लक्षणं दिसण्यासाठी ७ ते १४ दिवसांचा अवधी लागतो. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानं कोरोनाची लक्षणं आढळून येण्यास तीन दिवस जास्त मिळतील.
CoronaVirus: ...अन्यथा लॉकडाऊन ३० एप्रिललाच संपला असता; ३ कारणांमुळे वाढले ३ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 2:49 PM