नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशांनी मास्क आणि व्हेंटिलेटरचा पुरेसा साठा करण्याची सूचना केली होती. तरीही देशातून १९ मार्चपर्यंत या आवश्यक वस्तूंच निर्यात सुरु होती. ती कोणाच्या सांगण्य़ावरून करण्यात येत होती, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
WHO ने सल्ला देऊनही या वस्तूंच्या निर्यातीला परवानगी देणे हा देशवासियांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. तसेच हा गुन्हेगारी कट नाही का असाही प्रश्न विचारला आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या आरोपांची री ओढत विचारले की कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लागणारी अत्यावश्यक सामुग्री कशी काय निर्यात केली गेली. सर्व प्रकारच्या मास्क, व्हेंटिलेचर आणि मास्क बनविण्यासाठी लागणाऱ्या टेक्सटाईल्स साहित्याची निर्यात करण्यासाठी १९ मार्च पर्यंत परवानगी देण्यात आली. हे ट्वीट काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टवरून दिले आहे.
तसेच सुरजेवाला यांनी या ऑर्डरचे फोटोही पोस्ट केले असून हे मास्क आणि व्हेंटिलेटर दहा पट जास्त किंमत लावून परदेशात विकण्यात आले आहेत. हे साहित्य तर एम्समध्येही उपलब्ध नाही, मग परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न विचारला आहे.