नवी दिल्ली – जगात तसेच भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक लोक दहशतीमध्ये जीवन जगत आहेत. दिवसागणिक भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाला रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. संपूर्ण देशातील नागरिक एकजुटीने कोरोना संकटाशी मुकाबला करत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारसोबतच डॉक्टर, पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या स्तरावर कोरोनाच्या लढाईत योगदान देत आहे. अशावेळी उत्तराखंडमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची बातमी व्हायरल होत आहे. याठिकाणी ऋषिकेश मुनी येथील पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिचा निकाह रद्द केला आहे.
कोरोना व्हायरसच्या लढाईत फक्त डॉक्टर, आरोग्य कर्मचारी नव्हे तर पोलीसही रात्रंदिवस काम करत आहेत. अशावेळी या महिला पोलीस अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य निभावण्याची शपथ घेतली आहे. या महिला पोलिसाचं नाव शाहीदा परवीन असं आहे. तिने सुट्टी रद्द करत तिचा निकाह पुढे ढकलला आहे. ५ एप्रिल रोजी तिचा निकाह होणार होता. मात्र कोरोनाच्या लढाईत तिने आपलं कर्तव्य निभावण्याला प्राधान्य दिलं.
सर्वप्रथम आपला देश आणि कर्तव्य या शिकवणीमुळे शाहीदाच्या घरच्या लोकांनीही यासाठी परवानगी दिली. कोरोनाचा खात्मा झाल्यानंतरच मी निकाह करेन अशी शपथच तिने घेतली आहे. कोरोना संक्रमित लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचे निगराणीचं काम शाहीदावर आहे. शाहीदा परवीन देहरादूनच्या भानियावाला येथे राहणारी आहे. २७ मार्चपासून शाहीदा निकाहामुळे सुट्टीवर गेली होती. मात्र राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. त्यामुळे तिने निकाह पुढे ढकलत ३१ मार्चला ड्युटीवर हजर झाली.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ४ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, सुरक्षित अंतर ठेवावं अशाप्रकारे लोकांना आवाहन करण्यात येत आहे. सोशल डिस्टेंसिग सध्या एकमेव प्रभावी मार्ग कोरोना संक्रमणची साखळी तोडू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.