नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत. यामुळे खासदार, राष्ट्रपतींसह अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये कपात होणार आहे. खासदारांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे. अशातच पेन्शनधारकांमध्येही धाकधूक वाढली असून काही दिवसांपूर्वी पेन्शनमध्येही २० टक्के कपात करण्यात येणार असल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती.
यावर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने रविवारी खुलासा केला आहे. केंद्र सरकारकडून कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आलेली नाही. कोविड-१९ मुळे २० टक्के कपात ही अफवा आहे. एका ट्विटर युजरने ट्विट करत याची माहिती दिली होती. सोशल मिडीया आणि टीव्ही चॅनलवर केंद्र सरकारकडून कथितरित्या एक पत्रक त्याने पाहिले आहे, ज्यामध्ये पेन्शनमध्ये २० टक्क्यांची कपात करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने या ट्विटला उत्तर दिले असून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. सरकारडून देण्यात येणाऱ्या पेन्शनवर कोणताही फरक पडणार नाही.
अर्थमंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की, केंद्र सरकार पेन्शनमध्ये २० टक्क्यांची कपात करणार आहे. ही बातमी खोटी आहे. पेन्शन वितरणामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्याचा विचार नाहीय. सरकारची सध्याच्या आर्थिक योजनेचा पगार आणि पेन्शन योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही.
या ट्विटरकर्त्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ट्विट करून उत्तर दिले आहे. यावर स्पष्टीकरण मागितल्याबद्दल धन्यवाद! पेन्शनमध्ये कोणतीही कपात होणार नाही.