मुंबई - कोरोनाच्या लढाईत नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन आणि कळकळीची विनंती करण्यात येत आहे. मात्र, तरिही नागरिक घरातून बाहेर पडत आहेत. रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. पोलिसांनी बळाचा वापर सुरु केला, तर पोलिसांशी हुज्जत घालण्यात येत आहे. कोरोनाचं गांभीर्य अद्यापही अनेक शहरांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात दिसून येत नाही. त्यामुळेच, काही तरुण गाड्या घेऊन घराबाहेर पडत असून लॉकडाऊनचं उल्लंघन करत आहेत. लॉक डाऊनचं उल्लंघन करणाऱ्या या तरुणांना पोलीस वेवगेवळ्या प्रकारे धडा शिकवत आहेत.
मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गोरीहार येथील पोलिसांनी लॉकडाऊनच उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर हटके कारवाई केली. येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाने एका कामगार मुलाच्या कपाळावर, मैने लॉकडाऊन का उल्लंघन किया है.. मुझसे दूर रहना.. असा संदेशच काळ्या शाईने लिहिला. त्यानंतर, या महिला पोलीस उपनिरीक्षकावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांनी, संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे म्हटलंय.
सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संबंधित महिला पोलिसांच्या या कृत्याबद्दल टीका केली. तसेच, हे अशोभनीय असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले की, तो गरिब मजदूर असल्यानेच त्याच्यासोबत असे वर्तन केले. हीच कारवाई त्या आयएएस अधिकाऱ्याववर होईल का, जो कोरोना पॉझिटीव्ह असतानाही विविध ठिकाणी फिरत आहे. गरिबांसोबत सभ्ययतेने वर्तन आपण कधी शिकणार आहोत? असेही त्या युजर्सने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. १४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनं बंद आहेत. अशातच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोकांना गर्भीत इशारा दिला आहे. काही रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे त्याठिकाणी कृपा करुन गर्दी करु नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.