नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारताला जागतिक बँकेनं मोठा दिलासा आहे. जागतिक बँकेनं सरकारच्या योजनांसाठी १ बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज सामाजिक सुरक्षेसाठी असेल, असं बँकेनं म्हटलं आहे. याआधी कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेनं (एनडीबी) एक अब्ज डॉलरचा आपत्कालीन निधी जाहीर केला होता. जागतिक बँकेनं मुख्यत: शहरी गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी मदत जाहीर केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न झाल्यानं लाखो मजूर त्यांच्या गावाकडे परतत असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी जागतिक बँकेनं सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे. सरकारच्या ४०० हून अधिक सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.कोरोना संकटाच्या काळात निर्माण झालेला सामाजिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टीनं १ बिलियन अमेरिकन डॉलरचं पॅकेज उपयोगी ठरेल, असं मत जागतिक बँकेचे देशपातळीवरील संचालक जुनैद अहमद यांनी व्यक्त केलं. 'पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेलं आत्मनिर्भर पॅकेज अतिशय महत्त्वाचं आहे. जनतेचं आयुष्य आणि त्यांचा चरितार्थ यांच्या दृष्टीनं सरकारनं मांडलेली भूमिका योग्य आहे,' असं अहमद म्हणाले.१ बिलियन डॉलरच्या पॅकेजमधून नेमकी कोणाकोणाला मदत केली जाईल, याची माहितीदेखील अहमद यांनी दिली. वर्ल्ड बँकेकडून देण्यात आलेल्या पॅकेजचा वापर सामाजिक सुरक्षेसाठी करण्यात येईल. आम्ही सरकारसोबत काम करू. सामाजिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लोकांना स्थलांतरित व्हावं लागू नये. एकीकडून दुसरीकडे जावं लागू या दृष्टीनं जागतिक बँक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.