नवी दिल्ली : कोरोनाचा हाहाकार भारतात सुरूच असून, बुधवारी रुग्णसंख्या ५० हजारांच्या पूढे गेली. तीन दिवसांमध्ये ४० हजारांमध्ये १० हजार रुग्णांची भर पडल्याने पुढच्या काही दिवसांतच भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सर्वांत वर जाऊन स्थिर होण्याची भीती आरोग्य मंत्रालयास आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत असल्याने आता आरोग्य यंत्रणा सुधारित स्ट्रॅटेजीवर विचार करीत आहे.
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून, एकट्या मुंबईत त्यातील ९ हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आहेत.सतत समन्वय, केंद्रीय पथक दोनदा पाठवूनदेखील मुंबईत दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यांच्या समन्वयावरदेखील प्रश्नचिन्ह लागले आहे. केंद्र सरकार टेस्ट कीट्स पुरेसे उपलब्ध असल्याचे सांगून राज्यांना चाचण्यांची संख्यावाढविण्याची सूचना करीत आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना पहिल्याच आठवड्यात ४९ हजार ४३६ चा आकडा रुग्णसंख्येने गाठल्याने आरोग्य यंत्रणेत अस्वस्थता आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकार सज्जतेचा दावा करीत आहे. रुग्ण वाढीचे कारण मात्र अद्याप केंद्र सरकारला स्पष्ट करता आले नाही. रेड झोन, कंटेन्मेंट क्षेत्र, फिजिकल डिस्टन्सिंगवर भर देणाºया केंद्र सरकारने मद्य दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यावर गर्दी उसळली. अनेक राज्यांमध्ये त्यामुळे चिंता वाढली. मद्य दुकानांवर वाढणारी गर्दी, स्थलांतरित मजुरांचीगृह राज्यात परतण्यावर आता कोरोना रुग्णांची वाढ अवलंबून असेल, असा दावा सूत्रांनी केला.
आरोग्य मंत्रालय दिवसभरातून दोनदा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करीत असे. आता मात्र दिवसातून एकदाच ही आकडेवारीदेण्यात येईल.